इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत 330 नवीन ई- चार्जिंग स्टेशन्स उभारणार | 330 new e-charging stations will be set up in Mumbai for electric vehicles
इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत 330 नवीन ई- चार्जिंग स्टेशन्स उभारणार
330 new e-charging stations will be set up in Mumbai for electric vehicles
इलेक्ट्रिक वाहन वापरणे आणखी होणार सुखकर
मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मात्र ई चार्जिंग स्टेशन अधिक नसल्याने असे वाहन वापरण्यास अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेत येत्या दोन महिन्यांत मुंबईत ३३० नवीन ई चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. या स्टेशनवर सर्व प्रकारच्या गाड्या चार्ज होऊ शकतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणे आणखी सुखकर होणार आहे.
मुंबईतील २६ भागांमध्ये ही ३३० चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहन खरेदीला अजूनही पसंती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या जवळ किंवा आसपासच्या परिसरात चार्जिंग करणे सोपे व्हावे यासाठी बेस्टने ई- चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेतले आहे.
मुंबईत वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आता भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ई-वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून मुंबईत ई-चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार तीन चाकी, चार चाकी, व्हॅन, बस अशा सर्व वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मुंबईतील हवेची पातळी सातत्याने खालावली आहे. दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण हे आता मुंबईत दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवेचा निर्देशांक ३१० एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. मुंबईत सातत्याने होणारी बांधकामे, खाणकामे, शिवाय कारखान्याचा धूर, वाहनातून निघणार वायू यामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. याचा परिणाम सातत्याने हवेचे प्रदूषण वाढण्यावर होत आहे. या प्रदूषणात पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांमुळे भर पडत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी शासनाकडूनही प्रोत्साहित केले जात आहे. अशा वाहनचालकांना चार्जिंग स्टेशनची वानवा होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते.
वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक स्टेशन उभारून या समस्येचे समाधान करण्यासाठी शहरात मुंबई शहर, उपनगरातील बेस्ट आगार व इतर ३३० महत्त्वाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

Comments
Post a Comment